बौद्धगयामध्ये १० एकरवर उभारणार विश्रामगृह : पालकमंत्री शिरसाट

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जगातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या बौद्धगया येधील महाबोधी विहाराच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो उपासक, उपासिका, भिक्खू जातात. परंतु त्यांना राहण्यासाठी जागा नसल्याने कोणी रेल्वे स्थानक तर कोणी बस स्थानकात राहतात. त्यामुळे राज्यातील भाविकांसाठी या ठिकाणी १० एकर जागेवर भव्य असे विश्रामगृह बांधण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली. तसेच ५३ कोटी रुपये खर्च करून चवदार तळ्याचा विकास करणार असल्याचेही सांगितले.
बौद्धगया येथील महाबौधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासह विविध २३ ठराव मंजूर करण्यात आले. जागतिक धम्म परिषदेच्या समारोप सत्राचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याहस्ते करण्यात आले. या समारोप सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून विजया शिरसाठ, स्वागताध्यक्ष भन्ते सुगतशांती महाथेरो, माजी महापौर नंदकुमार घोडले, विकास जैन, रमेशभाई खंडागळे यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री शिरसाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला मंत्री होण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणार आहे. सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे तर आभार अनिलकुमार बस्ते यांनी मानले. आर्याजी भदन्त प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी आपल्या प्रास्ताविक केले. २०२९ मध्ये सातवी जागतिक धम्म संगिती याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.